देश-विदेश

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या प्रगतीचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव

मुंबई, दि. १३ : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांचे स्वागत केले. भारताची प्रगती, महाराष्ट्राची आर्थिक ताकद आणि भविष्यातील विकासदृष्टी यांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला.मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस, विविध देशांचे महावाणिज्य दूत, कौन्सुलर कॉर्प्सचे डीन आणि पोलंडचे महावाणिज्य दूत थॉमस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मंत्री छगन भुजबळ, मंगलप्रभात लोढा, आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारत ही जगातील सर्वात प्राचीन आणि वैविध्यपूर्ण संस्कृतींपैकी एक असून समावेशकता, सहिष्णुता आणि विविध विचारांचा स्वीकार ही देशाची वैशिष्ट्ये आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि जागतिक घडामोडींमध्ये निर्णायक भूमिका बजावणारा देश म्हणून उदयास येत आहे. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताने स्थान प्राप्त केले असून लवकरच पाच ट्रिलियन डॉलर्सपेक्षा मोठ्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दशकात भारताने गरिबी निर्मूलन, पायाभूत सुविधा विकास, नवकल्पना, तंत्रज्ञान आणि मानव संसाधन निर्मिती या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. भारतीय प्रतिभेने केवळ देशातीलच नव्हे तर जागतिक उद्योगविश्वालाही दिशा दिली आहे. हा नवा भारत विकासाचे नवे मानदंड निर्माण करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे शक्तिकेंद्र असल्याचे सांगताना त्यांनी राज्याची औद्योगिक, तांत्रिक आणि नवोन्मेष क्षेत्रातील आघाडी अधोरेखित केली. महाराष्ट्र हा देशाचा उत्पादन क्षेत्रातील अग्रणी प्रदेश, तंत्रज्ञान केंद्र, स्टार्टअपची राजधानी आणि गुंतवणुकीचे प्रमुख आकर्षण केंद्र असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबई ही केवळ आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजन क्षेत्राची राजधानी नसून जागतिक गुंतवणूक आकर्षित करणारे महत्वाचे केंद्र बनत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि नवी मुंबई परिसर देशाची डेटा सेंटर राजधानी म्हणूनही उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.राज्यात उभारण्यात येत असलेल्या वाढवण बंदराचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारताच्या सागरी सामर्थ्याला नवी दिशा देणारा हा प्रकल्प ठरणार आहे. सध्या देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरापेक्षा हे बंदर तीनपट मोठे असेल आणि जगातील अव्वल दहा बंदरांमध्ये त्याचा समावेश होईल.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात विकसित होत असलेल्या ‘तिसऱ्या मुंबई’ची संकल्पना आता प्रत्यक्षात आकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. एज्युकेशन सिटी, मेडी सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी, जीसीसी सिटी आणि नव्या व्यावसायिक जिल्ह्यांच्या माध्यमातून जागतिक दर्जाची शहरी परिसंस्था निर्माण केली जात आहे. तसेच वाढवण बंदर ते विरार या परिसरात ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याची संकल्पना पुढे नेण्यात येत असून देशातील पहिले ऑफशोअर विमानतळ आणि मुंबई महानगर क्षेत्रातील तिसरे विमानतळ पालघर जिल्ह्यात उभारण्याची राज्याची महत्वाकांक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात विविध औद्योगिक क्लस्टर्स विकसित करण्यात येत असून मुंबई, पुणे आणि मुंबई महानगर प्रदेशासोबतच छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, नाशिक आणि अहिल्यानगर ही नवी विकासकेंद्रे म्हणून उदयास येत आहेत. संरक्षण, विमानवाहतूक, स्वच्छ ऊर्जा, कंप्रेस्ड बायोगॅस आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होत असल्याचे त्यांनी सांगितले.राजनैतिक समुदाय आणि विविध देशांच्या वाणिज्यदूत कार्यालयांनी महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे विशेष आभार मानले. विविध देशांशी सहकार्य आणि भागीदारी अधिक दृढ होत असून त्यातून राज्याच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.महाराष्ट्र हे देशातील पहिले ट्रिलियन डॉलर्सचे उपराष्ट्रीय अर्थकारण असलेले राज्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून २०२९-३० पर्यंत हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. भारत अधिक न्याय्य, समावेशक आणि समन्वयाधारित जागतिक व्यवस्थेच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देत राहील, असेही त्यांनी सांगितले.राजनैतिक समुदायाशी सहकार्य, संवाद आणि संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. भारताची लोकशाही, तिरंगा आणि स्वातंत्र्याची मूल्ये जगाला प्रेरणा देत राहतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

भारताची प्रगती जगासाठी प्रेरणादायी – कौन्सुलर कॉर्प्सचे डेप्युटी डीन थॉमस

भारताच्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील दूरदृष्टी, धैर्य आणि त्यागाची आठवण करून देणारा असून एकता, विविधता, लोकशाही आणि प्रगती या मूल्यांचा गौरव करणारा असल्याचे मत कौन्सुलर कॉर्प्सचे डेप्युटी डीन तथा पोलंडचे महावाणिज्य दूत थॉमस यांनी व्यक्त केले. भारताने स्वातंत्र्यानंतर केलेली उल्लेखनीय प्रगती आणि जागतिक स्तरावरील वाढता सहभाग हा जगासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.भारत आणि विविध देशांमधील मैत्री व सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी कौन्सुलर कॉर्प्सला योगदान देण्याची संधी मिळत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.या विशेष प्रसंगी राजनैतिक समुदायाला एकत्र आणल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. भारतातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना भारताने जागतिक पटलावर अधिकाधिक प्रगती करावी आणि उज्ज्वल यश संपादन करावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.प्रास्ताविकात राजशिष्टाचार विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. राज्याच्या आर्थिक सामर्थ्यामुळे महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे सांगून त्यांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेतला.यावेळी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रातील प्रगतीची माहिती देणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button