निमगावात रस्ता काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन

जळगाव : तालुक्यातील निमगाव येथे गावातील अंतर्गत रस्ते मजबूत व सुरक्षित करण्याच्या उद्देशाने रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी विविध विकासकामे राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून या रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामास सुरुवात झाली.
गावातील नागरिकांची दळणवळणाची गैरसोय दूर व्हावी, पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुरवस्था टळावी आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ते उपलब्ध व्हावेत, यासाठी हे काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सरपंच अक्षय युवराज पाटील, उपसरपंच प्रशांत युवराज धनगर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत अवचित धनगर, ग्रामपंचायत सदस्य मंगल युवराज भील, तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज घनश्याम पाटील, कृष्णा डाकू पाटील, प्रविण अर्जुन पाटील यांच्यासह गावातील आबालवृद्ध ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या विकासकामामुळे निमगावातील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी अधिक चांगली सुविधा मिळणार असून, ग्रामस्थांनी या कामाचे स्वागत केले आहे.

