झुरखेड्यातील एसटी बससेवेसाठी ग्रामपंचायत सदस्या अॅड. कल्पना पाटील यांचा पुढाकार

जळगाव–बाभूळगाव बसफेरी सायंकाळी ५ वाजता करण्याची मागणी; विद्यार्थ्यांसह प्रवाशांना दिलासा देण्याचे आवाहन
झुरखेडा, ता. धरणगाव : झुरखेडा गावावरून जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसफेऱ्या नियमित व निर्धारित वेळेनुसार सोडण्यात याव्यात, तसेच जळगाव आगारातून सायंकाळी ४ वाजता बाभूळगावकडे जाणारी बसफेरी सायंकाळी ५ वाजता करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत झुरखेडा यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव मंजूर करून जळगाव आगार व्यवस्थापकांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
झुरखेडा येथे दि. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ठराव क्रमांक १० अन्वये एसटी बससेवेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. झुरखेडा गावातून जाणाऱ्या बसफेऱ्या निर्धारित वेळेनुसार नियमित व वेळेवर सुटत नसल्याने विद्यार्थी, पालक, नोकरदार तसेच इतर प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामपंचायत सदस्या तथा अॅड. कल्पना पाटील आणि ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
विशेषतः जळगाव आगारातून सायंकाळी ४ वाजता बाभूळगावकडे जाणारी बसफेरी सायंकाळी ५ वाजता करण्यात यावी, अशी मागणी अॅड. कल्पना पाटील यांनी केली आहे. सदर वेळेत बदल करणे तांत्रिक अथवा प्रशासकीय कारणामुळे शक्य नसल्यास झुरखेडा गावापर्यंत सायंकाळी ५ वाजता स्वतंत्र नवीन एसटी बसफेरी सुरू करावी, अशी पर्यायी मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना अॅड. कल्पना पाटील यांनी सांगितले की, या बससेवेचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. झुरखेडा येथील सुमारे ४० विद्यार्थी, सोनवद व बाभूळगाव मार्गावरील २८ विद्यार्थी तसेच पथराड येथील २६ विद्यार्थी या बससेवेवर अवलंबून आहेत. याशिवाय या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांची संख्याही मोठी आहे.
बसफेरीच्या विद्यमान वेळेमुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयातील नियमित लेक्चर्स व तासिका पूर्ण करता येत नसल्याने त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एसटी प्रशासनाने या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत जोडून ग्रामपंचायत झुरखेडा यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्या अॅड. कल्पना पाटील सोबत शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनी आगार व्यवस्थापक जळगाव यांचेकडे लोकनियुक्त सरपंच श्री. सुरेशआप्पा पाटील व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा तसेच सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीचा विचार करून एसटी प्रशासनाने बसफेरीच्या वेळेत बदल करावा किंवा पर्यायी बसफेरी सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे. आता एसटी प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे झुरखेडा व परिसरातील विद्यार्थी, पालक आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.


