शिष्यवृत्ती परीक्षेत जान्हवी विसावेची गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी

झुरखेडा | प्रतिनिधी
झुरखेडा येथील जिल्हा परिषद केंद्र मराठी शाळेची विद्यार्थिनी कु. जान्हवी वैशाली मनोज विसावे हिने इयत्ता ४ थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा–२०२६ (ग्रामीण) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्ता यादीत प्राविण्य मिळविले आहे. तिच्या या यशामुळे झुरखेडा गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जान्हवीने आपल्या अभ्यासातील सातत्य, मेहनत, चिकाटी आणि गुणवत्तेच्या जोरावर हे यश मिळविले. तिच्या यशात तिला मार्गदर्शन करणाऱ्या कु. कल्पना पाटील तसेच जिल्हा परिषद केंद्र मराठी शाळेतील सर्व शिक्षकांचे मोलाचे योगदान लाभले.
जान्हवीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कल्पना पाटील, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक तसेच ग्रामस्थांच्या वतीने तिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. यावेळी तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस तसेच विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी गावातील नागरिकांनी तिला शुभेच्छा दिल्या.
“मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठे यश संपादन करू शकतात,” हे जान्हवीच्या यशाने सिद्ध केले असून, तिच्या यशामुळे झुरखेडा गावातील विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे.


