संपादकीय

पारोळ्यात ग्रामसभेतील वादानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

शेवरे दिगर येथील घटनेने खळबळ; ग्रामसेवक संघटनेच्या आंदोलनानंतर सात जणांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक

पारोळा : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेवरे दिगर येथे १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान झालेल्या वादानंतर ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रल्हाद पाटील (वय ५४, रा. ओम नगर, पारोळा) असे मृत ग्रामसेवकाचे नाव आहे.
जुन्या कामांच्या बिलावरून वाद
शेवरे दिगर येथे १६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सभेदरम्यान जुन्या विकासकामांच्या बिलावरून ग्रामस्थ आणि ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे.
वादानंतर पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते ग्रामसभेतून निघून घरी गेले. मात्र, त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना पारोळा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर पुढील उपचारासाठी नेत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
सात जणांविरुद्ध गुन्हा; एकाला अटक
या घटनेनंतर ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी पारोळा पोलीस ठाण्यात दाखल झाले. ग्रामसभेतील वादामुळेच प्रल्हाद पाटील यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संशयितांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणी सात जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. आंदोलनानंतर पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृत प्रल्हाद पाटील यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे ग्रामसेवक वर्तुळात तसेच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button