झुरखेडा

चाळीसगावातील घरफोडीचा छडा; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

संशयित आरोपी ताब्यात; चोरीतील ४० हजारांची रोकड जप्त

जळगाव, प्रतिनिधी : चाळीसगाव शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीतील ४० हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, आरोपी व मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

दि. ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव शहरातील एका घराच्या मागील बाजूच्या भिंतीवरील पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील स्टीलच्या डब्यात ठेवलेली ८० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याची फिर्याद दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी संशयित नदीम शहा लियाकत शहा व त्याच्या साथीदारांवर संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संशयिताचा शोध घेत होते.

दरम्यान, गोपनीय बातमीदारामार्फत नदीम शहा हा चाळीसगाव शहरातील घाट रोड परिसरातील विष्णू पार्क येथे फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

४० हजारांची रोकड हस्तगत

पंचांसमक्ष संशयिताची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये रोख रक्कम आढळून आली. पोलिसांच्या चौकशीत सदर रक्कम चोरीतील असल्याचे त्याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर ही रक्कम पंचनामा करून जप्त करण्यात आली.

संशयित आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या गुन्ह्यातील इतर संशयितांचा तसेच उर्वरित चोरीच्या रकमेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, तसेच पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील, सागर पाटील आणि भूषण शेलार यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button