मुख्यमंत्रींची मोठी घोषणा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत महत्त्वाचे बदल
मुंबई | प्रतिनिधी
राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 मध्ये राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यासंदर्भातील 15 जुलै 2026 रोजीचे पुरक शासनपत्र सहकार विभागाने जारी केले आहे.
विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणेनुसार, 14 जुलै 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता नव्या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सुधारित निकषांनुसार, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज किंवा पुनर्गठित कर्जाची 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकबाकी आणि 31 मार्च 2026 पर्यंत न फेडलेले कर्ज, एकूण थकबाकी ₹2 लाखांपर्यंत असल्यास संबंधित शेतकऱ्यांना कमाल ₹2 लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जाणार आहे.
याशिवाय, एकवेळ समझोता (OTS) संदर्भातील एक तरतूद वगळण्यात आली असून, प्रोत्साहनपर लाभ योजनेतही 2026-27 वर्षाचा उल्लेख हटविण्यात आला आहे.
सहकार विभागाने जारी केलेले हे पुरक शासनपत्र वित्त विभागाच्या संमतीने प्रसिद्ध करण्यात आले असून, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.